धाराशिव (प्रतिनिधी)- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी समाजात माणुसकी, आपुलकी आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम धाराशिव तालुक्यातील आळणी येथे पार पडला. स्वाधार मतिमंद मुलींचा निवासी प्रकल्प, आळणी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला “आमचा वाढदिवस” हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहणाऱ्या, निरागस व विशेष काळजीची गरज असलेल्या मतिमंद मुलींचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा करण्याची ही संकल्पना केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, त्या मुलींच्या आयुष्यात आनंदाचा, आपलेपणाचा आणि विश्वासाचा क्षण निर्माण करणारी ठरली. केक कापण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू हेच या उपक्रमाचे खरे यश होते. या कार्यक्रमास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.संयोजनी राजेनिंबाळकर यांच्या सह उपस्थित होते. त्यांनी तेथील कर्मचारी, शिक्षक वृंद, आणि विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होताना अनुभवलेल्या भावना शब्दात मांडणे कठीण असल्याचे सांगितले. “या मुलींच्या डोळ्यांत दिसणारा विश्वास आणि निरागस आनंद हा आयुष्यभर लक्षात राहणारा आहे,” असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
या सामाजिक कार्यामागील प्रेरणास्थान असलेल्या श्री. शहाजी चव्हाण सर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला. मतिमंद मुलींसाठी स्वाधारसारखे निवासी बालगृह उभारणे ही केवळ संस्था सुरू करण्याची बाब नसून, समाजाने दुर्लक्षित केलेल्या आयुष्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्याची धाडसी जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. त्यांच्या संवेदनशील नेतृत्वातून उभे राहिलेले हे बालगृह अनेक मुलींसाठी खऱ्या अर्थाने ‘घर’ ठरले आहे. कार्यक्रमास श्रीमती भाग्यश्री पाटील (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर, धाराशिव), तहसीलदार श्रीमती मृणाल जाधव, नायब तहसीलदार श्रीमती विशाखा बलकवडे, श्री.दौलत निपाणीकर, सौ.पल्लवी निपाणीकर यांच्यासह स्वाधार प्रकल्पातील विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन वर्षाची सुरुवात अशा मानवतावादी उपक्रमाने होणे ही समाजासाठी आशा, सकारात्मकता आणि प्रेरणेची नवी पहाट असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. “आमचा वाढदिवस” हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता समाजाच्या जाणीवेत कायम राहावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
