तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्याच्या राजकारणात ड्रग्स आणि निवडणूक हे समीकरण गेल्या काही निवडणुकांपासून सातत्याने चर्चेत आहे. प्रत्येक निवडणूक जवळ आली की विरोधकांसह सत्ताधारी पक्षांचे मित्र पक्षही ड्रग्सचा मुद्दा प्रचारात आणत असल्याने हा विषय आता तालुक्याच्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे.

तीर्थक्षेत्र तुळजापुरात व तालुक्यातील ग्रामीण भागात ‌‘पिंट्या‌’ नावाच्या व्यक्तीमार्फत ड्रग्स आणल्याची चर्चा सध्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. राज्यातील व देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या पवित्र भूमीशी ड्रग्ससारख्या गंभीर विषयाचा संबंध जोडून निवडणूक काळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ड्रग्स प्रकरणाशी संबंधित बहुतांशी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आल्या असल्या तरी, ड्रग्सचा विषय स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांमध्ये सातत्याने चर्चेचा मुद्दा बनत आहे. यात भर घालत भाजपचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) चे नेते, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी “ड्रग्स आणि देवीचा प्रसाद” या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे हा विषय अधिकच पेटला आहे.

या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेवर प्रति-आरोप करत भाविकांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा दावा केला आहे. परिणामी, दोन्ही बाजूंनी आई तुळजाभवानी मातेच्या श्रद्धेचा राजकीय वापर होत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. राजकीय जाणकारांच्या मते, या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुळजापूर तालुका व धाराशिव जिल्ह्यात युद्धसदृश वातावरणात लढवल्या जातील, अशी चिन्हे दिसत असून ड्रग्सचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
Top