तुळजापूर (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) स्वबळावर लढवेल, असा ठाम निर्णय रविवारी दिनांक 4 जानेवारी रोजी तुळजापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत घेण्यात आला.

या. बैठकीस एस. टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनरावजी गोरे, सक्षणाताई सलगर, जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, प्रदेश सरचिटणीस मसूद भाई शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अशोक जाधव, अनिल शिंदे, दिलीप मगर, अमोल मगर, तोफिक शेख, शरद जगदाळे यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महाविकास आघाडीच्या जागावाटप प्रस्तावावर सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने मत व्यक्त केले की, महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये पक्षाला न्याय मिळायला हवा. यासंदर्भात काँग्रेसचे नेते धीरज पाटील व शिवसेनेचे नेते ऋषी मगर यांच्याशी दोन ते तीन वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संयुक्त बैठक घेण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद किंवा निरोप प्राप्त न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडताना सांगितले की, काटगाव, मंगरूळ, काटी व नांदगाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक व पूर्वीचे मतदारसंघ असून या जागांवर पक्षाचा स्वाभाविक दावा आहे. या मतदारसंघांमध्ये आजही राष्ट्रवादी काँग्रेस व शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे या जागांवर पक्षाला सन्मानाने संधी मिळावी, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच, जर महाविकास आघाडीतून सन्मानजनक जागावाटप झाले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या सर्व 9 गटांमध्ये व पंचायत समितीच्या 18 जागांवर निवडणूक लढविण्यास पूर्णतः सज्ज असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

 
Top