धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजात मोठ्या संख्येने उद्योजक आहेत. पण ते विखुरलेले आहेत. या उद्योजकांना एकत्रित करून प्रोत्साहन देण्याचे कार्य एमईए (मराठा उद्योजक संघटना) करत आहे. या संघटनेत मराठा उद्योजकांनी जास्तीत जास्त योगदान देऊन तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन नॅचरल शुगर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केले.
धाराशिव येथे मराठा उद्योजकांचा भव्य मेळावा शनिवार, 10 जानेवारी रोजी पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचावर उद्योजक हनुमंत मडके, विक्रम गायकवाड, पी. के. मुंडे, चित्राव गोरे, विजय बारकुल, सतीश देशमुख, उमेश सोकांडे, विक्रम नरसाळे, बालाजी येरुळे, आश्रम काळे आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना श्री. ठोंबरे म्हणाले, मराठा समाजातले तरुण आज रोजगार निर्मितीत उतरले पाहिजेत. कारण सर्वांना नोकऱ्या मिळत नाहीत. म्हणून मराठा उद्योजकांनी जास्तीत जास्त उद्योग निर्मितीत उतरले पाहिजे. ग्रामीण भागात उद्योगाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये शेतीमाल प्रक्रिया, पशुपालन व इतर क्षेत्रात काम करून उद्योग निर्मिती करता येते. यातून मराठा तरुणांनी एकत्र येऊन उद्योग उभारणी करावी असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजक तथा एमईएचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश विषद केला. ते म्हणाले, मराठा उद्योजकांना एकत्र करून मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देण्याचा आमचा उद्देश आहे. मराठा समाजातील उद्योजकांनी आपला उद्योग फेल होईल याची भीती बाळगू नये. उद्योजकांना कर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
यावेळी उद्योजक हनुमंत मडके, पी. के. मुंडे, चित्राव गोरे, विजय बारकुल, सतीश देशमुख, उमेश सोकांडे, विक्रम नरसाळे, यांनीही मराठा समाजातील उद्योजकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. मेळाव्यात धारशिव शहर व जिल्ह्यातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.मेळाव्याचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले. मेळाव्यामध्ये अनेक उद्योजकांनी आपल्या मान्य शंकांचे निरसन केले. मेळाव्याला मराठा समाजातील तरुण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.