कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरात महिलांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या टवाळखोरांसाठी आता पोलिसांचा चाबूक सज्ज झाला आहे. शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणाऱ्या तथाकथित ‘रोड रोमिओं’वर कळंब पोलिसांनी निर्दय कारवाईचा सपाटा सुरू केला असून, पोलीस निरीक्षक अजित चिंतले अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

शहरातील मुख्य रस्ते, शैक्षणिक परिसर व वर्दळीच्या ठिकाणी बिनधास्त फिरणाऱ्या टवाळखोरांनी महिलांना त्रास देण्याचे प्रकार वाढवले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कळंब पोलिसांनी साध्या वेशातील पथके रस्त्यावर उतरवत रोड रोमिओंची थेट धरपकड सुरू केली आहे.


कडक कारवाईचे स्वरूप :

शाळा-महाविद्यालय परिसरात करडी नजर आणि सातत्यपूर्ण गस्त, महिलांची छेड काढणाऱ्यांना ताब्यात घेऊन कायद्याचा धडा,विनापरवाना, वेगवान व कर्कश हॉर्न वाजवणाऱ्या दुचाकींवर थेट दंडात्मक कारवाई, संशयित तरुणांची रस्त्यावरच चौकशी आणि समज. 


‘छेडछाड खपवून घेतली जाणार नाही’ – पोलीस निरीक्षक अजित चिंतले

“कळंब शहरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. छेडछाडीचा प्रकार घडल्यास नागरिकांनी भीती न बाळगता थेट पोलिसांशी संपर्क साधावा,” असा खणखणीत इशारा पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी दिला.


टवाळखोरांचे धाबे दणाणले

पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील टवाळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालक व महिलांकडून पोलिसांच्या कारवाईचे जाहीर स्वागत केले जात आहे. ‘रोड रोमिओमुक्त कळंब’ हे ध्येय ठेवून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 
Top