धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे दिवंगत नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव घेऊन करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राज्यभर तीव्र संताप व्यक्त होत आहे. या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
डॉ. पाटील म्हणाले की, स्वर्गीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वमान्य, संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्व होते. अशा थोर नेत्यांविषयी अशोभनीय वादग्रस्त वक्तव्य करणे हे अत्यंत दुर्दैवी असून सध्याचे राजकारण कोणत्या खालच्या पातळीवर जात आहे, हे यावरून स्पष्ट होते. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही सुसंस्कृत, सभ्य आणि विचारप्रधान राहिली आहे. वैचारिक मतभेद असले तरी दिवंगत नेत्यांविषयी आदर राखणे ही परंपरा आहे. मात्र सदर वक्तव्याने त्या परंपरेला तडा गेला असून याची जाणीव संबंधितांनी ठेवणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकारामुळे जनभावना दुखावल्या असून राज्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे संबंधित वक्तव्याचा जाहीर निषेध करत असल्याचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.
