धाराशिव (प्रतिनिधी)-   जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात प्रशासनाने सार्वजनिक मालमत्ताचे  विद्रुपीकरण करण्यासंबंधी कडक आदेश जारी केले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू असल्याने,जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी हे आदेश दिले आहेत. निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय सार्वजनिक मालमत्ता यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपीकरण होऊ नये,यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स तसेच भिंतीवर जाहीरात प्रदर्शित करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी संपल्यानंतर हे साहित्य तात्काळ काढून टाकणे व मालमत्ता पूर्ववत करणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये हा आदेश जारी केला असून, हा आदेश 13 जानेवारीपासून ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अंमलात राहील.या आदेशाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व सुव्यवस्था राखणे हा आहे.

 
Top