धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र राज्यात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले असून,हा उपक्रम महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरत आहे.श्री प्रकाश आबिटकर,मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,महाराष्ट्र राज्य आणि राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.
या अभिनव उपक्रमाला राज्यभरातील महिलांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, महिलांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली आहे.“मेनोपॉज हा आजार नसून महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे.मात्र या काळात महिलांना शारीरिक व मानसिक आधाराची नितांत गरज असते.प्रत्येक महिलेला योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा, या उद्देशाने मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील टप्पा असून,या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हार्मोनल असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर अनेकदा दुर्लक्ष झाले होते. यामुळे महिलांना शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या समस्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी समुपदेशन व योग्य उपचाराचा प्रभावी पर्याय शासनाने उपलब्ध करून दिल्याबद्दल समाजातून कृतज्ञता व्यक्त होत आहे.