धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम जाहीर केल्याने त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी,या दृष्टीकोनातून निवडणूक काळात लाऊडस्पीकरच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, निवडणुका कोणत्याही अडथळ्याविना व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत ध्वनीक्षेपकांच्या वापरावर जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी प्रतिबंध केला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार,जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत कोणत्याही वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊनच करता येईल.मात्र, ध्वनीक्षेपकाचा वापर करताना वाहन चालू ठेवणे प्रतिबंधित राहील. तसेच, वाहनावर बसवलेले असोत किंवा अन्य प्रकारचे असोत,सर्व प्रकारच्या ध्वनीक्षेपकांचा वापर दररोज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगीयोग्य राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, निवडणूक उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी ध्वनीक्षेपक वापरासंबंधीची परवानगी व तपशील संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नजिकच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील. या आदेशाचा कोणीही भंग केल्यास संबंधित व्यक्ती भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार शिक्षेस पात्र ठरणार आहे.हा बंदी आदेश दिनांक 13 जानेवारीपासून ते दिनांक 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत अंमलात राहील.