धाराशिव (प्रतिनिधी)- तलवार हातात असूनही मन ध्यानात रमलेले असणे, हेच खरे शौर्य आहे. धर्मासाठी उभे राहताना द्वेष नव्हे तर करुणा ठेवणे, हीच श्री गुरु तेग बहादुर साहेबांची महान शिकवण आहे. धर्मस्वातंत्र्य,मानवी मूल्ये आणि निर्भयतेसाठी दिलेले त्यांचे बलिदान आजच्या समाजासाठी दीपस्तंभ ठरत असून, श्री गुरु तेग बहादुर साहेबांचे योगदान म्हणजे शौर्य आणि साधना यांचा अद्भुत संगम आहे, असे प्रतिपादन जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य भैरवनाथ कानडे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग व सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग,धाराशिव यांच्या वतीने ‌‘हिंद-दी-चादर‌’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम तसेच श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या 350 व्या गुरुतागदी शताब्दी समागम वर्षानिमित्त आयोजित व्याख्यान व बक्षीस वितरण कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात “श्री गुरु तेग बहादुर साहेब यांचे जीवनकार्य” या विषयावर प्रमुख व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अकानडे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अमोल ताकभाते हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभाग, लातूर येथील प्रादेशिक उपसंचालक डॉ.तेजस माळवदकर तर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक भैरवनाथ कानडे उपस्थित होते.

याच कार्यक्रमात आश्रम शाळा क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मैदानी सांघिक तसेच विविध वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना प्रादेशिक उपसंचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग,लातूर डॉ.तेजस माळवदकर तसेच श्री.भैरवनाथ कानडे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या वेळी बोलताना डॉ.माळवदकर यांनी सांगितले की,क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित होतात आणि अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग,श्री.अमोल ताकभाते यांनी अध्यक्षीय भाषणात, “गुरु तेग बहादुर साहेबांचे बलिदान केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले होते. अशा महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर सचिन नटवे,विकास राठोड,संदेश घुगे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन दयानंद राठोड यांनी केले. ‌‘हिंद-दी-चादर‌’ या कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादुर साहेबांच्या शौर्य, साधना व मानवतेच्या विचारांचा जागर झाला असून उपस्थितांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी व दिशादर्शक ठरला.


 
Top