मुरुम (प्रतिनिधी)- रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने संभाजीनगर, काबरा प्लॉट येथे महिलांसाठी भव्य असा हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

या हळदी-कुंकू कार्यक्रमामध्ये महिलांना भेटवस्तू म्हणून “अभ्यास कसा करावा” हे पुस्तक देण्यात आले. ही भेट केवळ सांस्कृतिक परंपरेपुरती मर्यादित न ठेवता सामाजिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरावी, हा यामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. उमा सूर्यवंशी यांनी सांगितले की, मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणे ही जबाबदारी प्रामुख्याने महिलांची आहे. घरातील वातावरण अभ्यासपूरक बनविण्यात महिलांचा वाटा महत्त्वाचा असून, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मातांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. भेट म्हणून देण्यात आलेले “अभ्यास कसा करावा” हे पुस्तक मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यास आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता राठोड , स्वामी मॅडम, मंगल दूधगे, प्रीती चौधरी, महादेवी बदोले, सुनीता निंबर्गे, गोकर्णा शेवाळकर, शेडेकर मॅडम, सुवर्णा खुळ, शारदा राठोड, राजश्री पवार यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम परंपरा, संस्कृती आणि शिक्षण यांचा सुंदर संगम ठरला असून रोटरी क्लब मुरूम सिटीच्या सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top