धाराशिव (प्रतिनिधी)-  स्वच्छ महाराष्ट्र मिशन व नगरपरिषद, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव येथे विद्यार्थ्यांसाठी ‌‘घनकचरा व्यवस्थापन‌’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कृष्णा भिसे यांनी विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले.

कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कचऱ्याचे विविध प्रकार, कचरा कमी करण्यासाठी अंगीकारावयाच्या चांगल्या सवयी, तसेच ‌‘पाच आर‌’ (Reduce, Reuse, Recycle, Refuse, Recover) संकल्पनेद्वारे कचरा कसा कमी करता येतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग घेण्यासाठी प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले असून योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. वेगवेगळ्या कार्ड्स व दृश्य (व्हिज्युअल) माध्यमांच्या सहाय्याने माहिती आकर्षक व प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले.

 
Top