धाराशिव (प्रतिनिधी)- संस्कारक्षम शिक्षणातुन सामाजिक नेतृत्व तयार होते असे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे जलसंधारण पाणी व पडीक जमीनीच्या शाश्वत विकासासाठी युवकांचा सहभाग हे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे काजळा, ता. धाराशिव येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बाळासाहेब शिंदे म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी मराठवाड्यातील तरुणांसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे तरुण पिढी संस्कारीत झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार हे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे केवळ ब्रीद वाक्यच नाही तर एक महामंत्र आहे. यावेळी मुख्याध्यापक वागतकर शिवाजी यांनी मनोगत व्यक्त केले. सदरप्रसंगी काजळा येथील सरपंच प्रविण बाबुराव पाटील, हभप. राम महाराज पांचाळ यांच्या सह सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय साखरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर आभार कार्यक्रमाधिकारी मोहन राठोड यांनी मानले.
