वाशी (प्रतिनिधी) :तालुक्यातील पारा येथील शेतकऱ्यांच्या शेतातून सेंरेटिका टॉवर कंपनीचे टॉवर व उच्चदाब तारा गेल्या असून, यासाठी ठरलेला मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. या अन्यायाविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट टॉवरवर चढून तीव्र आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

दि. २ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून दत्ताराम चंदर काळे, गोरख वसंत काळे, युवराज सुभ्राव काळे, धनंजय रामचंद्र काळे व कृष्णा उत्तमराव काळे हे शेतकरी त्यांच्या शेतातील टॉवरवर चढून बसले होते. मोबदला मिळेपर्यंत खाली उतरणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, वाशी तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे तसेच सेंरेटिका कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासन व कंपनीकडून शेतकऱ्यांना खाली उतरविण्यासाठी वारंवार विनवण्या करण्यात आल्या. मात्र, मागणी पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगत शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनीही टॉवरवर चढण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. यावेळी पोलीस यंत्रणा व आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चकमक होऊन काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर कंपनीचे कर्मचारी, प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर सेंरेटिका टॉवर कंपनीने येत्या गुरुवारपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना ठरलेला मोबदला देण्याचे  आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत टॉवरवरून खाली उतरले. प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.

 
Top