वाशी (प्रतिनिधी)- धवलसिंग करतारसिंग चितोडिया (रा. अमरावती) यांच्या मालकीची युनिकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल सुमारे चार महिन्यांपूर्वी मौजे वाशी हद्दीत चोरीस गेली होती. जडीबुटी व्यवसायाच्या निमित्ताने वाशी येथे आले असताना ही दुचाकी चोरीस गेली होती. मात्र, या घटनेबाबत संबंधित पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नव्हती.
वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शंकर शिंदे यांच्या आदेशानुसार हद्दीतील मालमत्ताविषयक गुन्हे रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून नियमित पेट्रोलिंग करण्यात येत होते. याच दरम्यान पोहेका बोरकर, पो. का. सय्यद व पो. का. पवार यांना मौजे पिंपळगाव कमळेश्वरी, ता. वाशी येथे सदर मोटारसायकल संशयास्पद अवस्थेत मिळून आली. पोलिसांनी तत्काळ ती ताब्यात घेतली.
त्यानंतर दुचाकीच्या मूळ मालकाबाबत माहिती संकलित करून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. चौकशीअंती सदर मोटारसायकल ही धवलसिंग करतारसिंग चितोडिया यांची असल्याची खात्री झाल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोटारसायकल मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली.
चार महिन्यांनंतर आपली चोरीस गेलेली मोटारसायकल परत मिळाल्याने धवलसिंग चितोडिया यांनी वाशी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. वाशी पोलिसांच्या सतर्कता, दक्षता व प्रभावी कार्यवाहीमुळे चोरीस गेलेली मालमत्ता मूळ मालकाला परत मिळाल्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
