धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग,धाराशिव यांच्या कार्यालयास गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार“ व “नालाखोलीकरण व रुंदीकरण“ या महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून सन 202425 मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या एकूण 58 कामांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे.
शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीमध्ये जलसंपदा विभागाची एकूण 23 कामे व जलसंधारण विभागाची एकूण 35 कामांचा समावेश आहे.ही कामे 21 अशासकीय संस्था व 1 ग्रामपंचायत यांच्यामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहेत.
या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या शिवारातील पाण्याचा साठा वाढविणे, भूजल पातळी उंचावणे, शेतजमिनीतील गाळ व सुपीक मातीचा पुनर्वापर करणे तसेच पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे हे प्रमुख उद्दिष्ट साध्य होत आहे.“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार“ या योजनेमुळे धरणातील गाळ काढून तो शेतात टाकण्यात येतो,त्यामुळे धरणाची साठवण क्षमता वाढते व शेतजमिनीची सुपीकता सुधारते.तसेच “नाला खोलीकरण व रुंदीकरण“ योजनेमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले जाते,पूरस्थिती कमी होते, पाणी जमिनीत मुरते व विहिरी, बोअरवेल व नदी-नाल्यांचे पाणीपातळी वाढण्यास मदत होते. परिणामी शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढून उत्पादनक्षमतेत वाढ होते.
निधी प्राप्त झालेल्या कामांची त्रयस्थ अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी दिले होते.त्या आदेशाच्या अनुषंगाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या सर्व 58 कामांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली असून या पडताळणीत कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही.
तरी संबंधित शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की,सदर कामांबाबत कोणतीही समस्या असल्यास त्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण विभाग,धाराशिव यांच्या कार्यालयास तीन दिवसांच्या आत लेखी स्वरूपात आपली समस्या सादर करावी.सादर करण्यात आलेल्या तक्रारींचे योग्य ते निराकरण करण्यात येईल.तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सदर कामांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.