धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यात सोलापूरधुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 8 लाख 28 हजार 659 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी ट्रक चालक रामजी शोभनाथ यादव हे कंटेनरमधून नवीन टायर घेऊन सोलापूर-धुळे हायवेवरून जात असताना, लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा परिसरात त्यांच्या कंटेनरमधील नवीन टायर अज्ञात आरोपींनी लुटले होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी पथकाला विशेष सूचना दिल्या. त्या अनुषंगाने दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना, गुप्त माहितीनुसार संशयित अनिल मच्छींद्र पवार (वय 34, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) व त्याचा साथीदार नाना तानाजी शिंदे (वय 27, रा. भिकारसारोळा, ता. जि. धाराशिव) हे तेरखेडा गावात आले असल्याचे समजले. पोलीस पथकाला पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी इतर दोन साथीदारांसह हायवेवरून जाणाऱ्या कंटेनरमधून नवीन टायर लुटल्याची तसेच पानगाव येथे चोरी केल्याची कबुली दिली.

याशिवाय वाशी, बेंबळी, येरमाळा व भादा पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकली लक्ष्मी पारधी पिढीच्या पाठीमागील फॉरेस्ट परिसरात लपवून ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून 29 नवीन टायर, 4 चोरीच्या मोटारसायकली, गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच गुन्हा करताना वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण 8 लाख 28 हजार 659 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार महबूब अरब व रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

 
Top