भूम (प्रतिनिधी)- मागील अनेक वर्षांपासून भूम तालुक्यातील काही गड किल्ले प्रेमी युवकांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळी म्हणजेच किल्ले पुरंदरच्या वळणावर एक प्रवेशद्वार उभे राहावे हे पाहिलेले स्वप्न काही ध्येयवेड्या तरुणांनी एकत्र येऊन पूर्ण केले आहे.
मागील आठवड्यात दिनांक 16 जानेवारी रोजी श्री शंभू राज्याभिषेक सोहळा किल्ले पुरंदर या ठिकाणी अगदी थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्याचे औचित्य साधून भूम तालुक्यातील श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी एकत्र येऊन किल्ले पुरंदरच्या रस्त्यावर एक आकर्षक अशी लोखंडी स्वागत कमान उभारली असून आता ही कमान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
याबाबत बोलताना श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानचे विठ्ठल बाराते म्हणाले की, इतिहासाला वंदन करणारी एक आकर्षक दगडी वेस बांधण्याचे आमचे स्वप्न होते. मात्र आम्ही खूप प्रयत्न करून देखील आमच्या या कार्याला आर्थिक मर्यादा आडव्या आल्या. तरीही आम्ही धीर न सोडता दगडी नाही तर किमान लोखंडी का होईना स्वागत कमान उभी करण्याचा निश्चय केला. आमची प्रेरणा घेऊन उद्याची येणारी नवीन पिढी त्या जागी दगडी वेस उभा करील अशी आशा मनात बाळगून सर्वांनी एकत्र येऊन अखेर कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्णत्वास नेले आहे असे बाराते यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान अनेक तरुणांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असून प्रतिष्ठानच्या या कार्याबद्दल सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
