तुळजापूर (प्रतिनिधी)-  महास्टराईड  अंतर्गत श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या जतन, संवर्धन व विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी तुळजापूर येथे एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत पाचुंदा तलाव व रामदरा तलाव परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या व प्रस्तावित असलेल्या विकासकामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. जलसौंदर्यीकरण, सुरक्षितता, पर्यटकांसाठी सुविधा, तसेच परिसराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या कामांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

याच बैठकीत तुळजापूर येथे साकारण्यात येणाऱ्या आई तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार प्रदान करतानाचा भव्य व ऐतिहासिक पुतळा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबतही सखोल चर्चा झाली. हा पुतळा तुळजापूरच्या ऐतिहासिक परंपरेचे आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाचे प्रतीक ठरणार असून भाविक व पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

येत्या काळात  अंतर्गत होणाऱ्या या सर्व विकासकामांमुळे तुळजापूरच्या धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन महत्त्वाला नवे बळ मिळणार आहे. भाविक व पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित, सुसज्ज व आकर्षक सुविधा उपलब्ध होणार असून तुळजापूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

या आढावा बैठकीस आमदार राणा जगजीतसिंह पाटील  जिल्हाधिकारी श्री. किर्ती किरण पुजार, तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. विनोद गंगणे, पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती जया वहाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. नरसिंग मंडे, उपविभागीय अधिकारी श्री. ओंकार देशमुख, तहसीलदार श्री. अरविंद बोळंगे, तहसीलदार श्रीमती माया माने यांच्यासह आयआयटी मुंबई येथील तज्ज्ञांची टीम तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top