धाराशिव (प्रतिनिधी)- दिशाहीन झालेल्या समाजाप्रति सजग राहून आपण कायदेविषयक जनजागृती केली पाहिजे. सर्वच आस्थापनेमध्ये महिला तक्रार निवारण समिती अनिवार्य असून या संदर्भात कुठलीही तक्रार असेल तर मदत करण्यास विधी सेवा प्राधिकरण चोवीस तास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद आणि यश मेडिकल फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय युवा दिन आणि नशा मुक्त भारत अभियान व कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश भाग्यश्री पाटील, यश मेडिकल फाउंडेशनचे चे प्रमुख डॉ संदीप तांबारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, अँड अभय पाथरुडकर, ॲड.डी.के देवळे, प्रा. डॉ. प्रीती माने, अँड.मोहिनी शिरुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय युवा दिन आणि नशा मुक्त भारत अभियान या विषयावर बोलताना डॉ. संदीप तांबारे म्हणाले की नशा फक्त दारू सारख्या पदार्थाचीच नाही तर मोबाईल सारख्या वस्तू , सोशल मीडिया ही सुद्धा एक नशा आजच्या युवकांमध्ये पसरलेली आहे. नशे मुळे होणारी घराची वाताहात आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी त्यांनी विस्तृतपणे माहिती विद्यार्थ्यांना अनेक रंजक आणि विनोदी प्रसंगातून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कायदेविषयक प्रबोधन नेहमीच महाविद्यालयांमध्ये विविध विषयावर घेतले जात असून यावेळी “पॉश“ कायद्या अंतर्गत माहिती विद्यार्थ्यांना मिळणे ही काळानुसार गरज आहे. महाविद्यालयातील विविध घडामोडींची माहिती देत असतानाच डॉ.संदीप तांबारे यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी अँड अभय पाथरूडकर यांनी “पॉश “कायद्याविषयी सविस्तर माहिती देऊन महाविद्यालयाच्या परिसरात घडणारी प्रत्येक केस समोपचाराने कशी सोडवावी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी अँड. डी के देवळे यांनी ड्रग फ्री इंडिया यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनीता गुंजाळ यांनी केले, तर प्रास्ताविक, अँड. मोहिनी शिरुरे यांनी केले.तर आभार डॉ. प्रीती माने यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवार, प्रा. डी डी मुंडे, प्रा.सायली पवार यांनी विशेष प्रयत्न केले.
