भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपरिषदेतील विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध पार पडत जनशक्ती शहर विकास आघाडीच्या पॅनलने मोठे यश मिळवले. नगर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या महिला व बालकल्याण, बांधकाम, पाणीपुरवठा तसेच नगर व नियोजन समित्यांच्या सभापतीपदी आघाडीच्या उमेदवारांची एकमताने निवड झाल्याने नगर परिषदेच्या कारभाराला स्थैर्य मिळाले आहे.
यामध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष लक्ष्मी प्रशांत साठे यांची निवड करण्यात आली. तसेच बांधकाम समितीच्या सभापतीपदी अनिल शेंडगे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी नवनाथ रोकडे, तर नगर व नियोजन समितीच्या सभापतीपदी रामराजे कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सर्व समित्या शहराच्या सर्वांगीण विकासात कणा म्हणून ओळखल्या जातात. विशेष म्हणजे या सर्व निवडी कोणत्याही विरोधाशिवाय बिनविरोध पार पडल्या.
