धाराशिव (प्रतिनिधी)- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली पाच दिवसाचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची अतिशय जिव्हाळ्याची मागणी केंद्र सरकारने तात्काळ मान्य करावी यासाठी आज बँक कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संपाची हाक देऊन देशभरातील बँकिंग व्यवहार ठप्प केले. यापुढे देखील मागणी मान्य न झाल्यास दोन दिवसीय किंवा बेमुदत संपाचा इशारा स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन धाराशिव रिजनचे नेते कॉम्रेड गोरखनाथ लवटे यांनी दिला आहे.
मागील काही वर्षात बँकांमध्ये कामाचा बोजा कैक पटीने वाढलेला आहे. आठ तासाचे कामाचे स्वरूप असतानाही दहा ते बारा तास बँकेत बसून तसेच सुट्टी दिवशीही बँकेत येऊन प्रलंबित कामे करावी लागत आहेत. बँकांचा व्यवसाय अनेक पटीने वाढलेला असताना सुद्धा कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत आहे. ज्यामुळे बँक कर्मचारी प्रचंड तणावाखाली काम करीत आहेत. कामकाज व जीवन संतुलनाचा भाग म्हणून बँक कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा म्हणूनच अत्यावश्यक झालेला आहे. परंतु असे असतानाही आयबीए व केंद्र सरकारकडून पाच दिवसाच्या आठवड्या बाबत कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले जात नाही व त्यासंदर्भात केवळ कर्मचाऱ्यांना आशेवरती ठेवले जात आहे.
यावेळी एसबीआय स्टाफ युनियनचे पदाधिकारी अंकुश चव्हाण, श्रीचंद निलंगेकर, एसबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे पदाधिकारी पद्माकर चांदणे, अविनाश कडू, एआयबीइए संघटनेचे शाहनवाज मुलानी, प्रमोद सुरवसे यासह धाराशिव शहर व परिसरातील 100 पेक्षा अधिक कर्मचारी व विविध बँकांमधील संघटनेचे सभासद उपस्थित होते.
