धाराशिव (प्रतिनिधी)-   राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम जाहीर केल्याने त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, या दृष्टीकोनातून नमुना मतपत्रिका छपाईबाबत निर्बंध घातले आहे.

राजकीय पक्ष,निवडणूक लढविणारे उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी अथवा हितचिंतक, तसेच मुद्रणालयांचे मालक, इतर सर्व माध्यमांतून छपाई करणारे मालक व प्रकाशक यांनी नमुना मतपत्रिका छापताना काही बाबींचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामध्ये इतर उमेदवारांचे नाव व त्यांना आयोगाने नेमून दिलेले चिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केलेल्या प्रकारचा कागद वापरणे आणि आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातच नमुना मतपत्रिका छापणे यास निर्बंध करण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार,नमुना मतपत्रिकांच्या छपाईवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत,म्हणजेच दिनांक 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत, निर्बंध लागू राहतील. हे आदेश दिनांक 13 जानेवारी ते दिनांक 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत अंमलात राहतील.

 
Top