धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील चिलवडी परिसरातील राजकीय समीकरणे बदलली असून, भाजपचे तालुका कार्यकारिणी सदस्य व चिलवडीचे माजी उपसरपंच अजित सावंत आणि संतोष राजगुरू यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.
या मोठ्या प्रवेशामुळे चिलवडी आणि परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, आगामी काळात पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पक्षात प्रवेश केलेल्या नवीन सहकाऱ्यांचे स्वागत करताना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, “हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्व सहकारी प्रामाणिकपणे काम करतील. ग्रामीण व शहरी भागातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असून, या नव्या फळीमुळे संघटना अधिक मजबूत होईल.“ नवनियुक्त सदस्यांनीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून, पक्षवाढीसाठी एकनिष्ठेने काम करण्याचा निर्धार यावेळी बोलून दाखवला. या प्रवेशामुळे चिलवडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख उपस्थितांची मांदियाळी या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने सतीश सोमानी (तालुकाप्रमुख), सौदागर जगताप (उपतालुकाप्रमुख), अमोल मुळे (वडगाव सी. विभागप्रमुख), किरण बोचरे, बाबा कोळी (ग्रा.पं. सदस्य), अनंत जाधव, बालाजी जाधव (चिलवडी गणप्रमुख), शौकत भाई शेख, राजेंद्र जाधव, आबासाहेब माळी, कृष्णा जाधव, सुधीर जाधव यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
