कळंब (प्रतिनिधी)- फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘किसान मित्र कृषी प्रदर्शन 2026’ अंतर्गत ऊस परिषद उत्साहात पार पडली. शेतकरी सक्षमीकरण, उत्पादनवाढ, खर्च नियंत्रण व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या मुद्द्यांवर या परिषदेत सखोल चर्चा झाली.
परिषदेस नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनील दळवी, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ अण्णा तोडकर, पांडुरंग आवाड, तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, बाजार समिती सचिव दत्तात्रय वाघ, नॅचरल शुगरचे संचालक किशोर डाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बी. बी. ठोंबरे यांनी सेंद्रिय शेती, रासायनिक खतांचा मर्यादित वापर व एआय तंत्रज्ञानाद्वारे कमी खर्चात अधिक उत्पादनावर भर दिला. डॉ. सुनील दळवी यांनी ‘वसंत ऊर्जा’ या जैवसंजीवकाची माहिती देत रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापराविषयी इशारा दिला. तर विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी महिलांच्या आर्थिक सहभागातून ग्रामीण विकास साध्य होईल, असे मत व्यक्त केले. शास्त्रज्ञ, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी एकाच मंचावर आल्याने परिषद विशेष ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राचार्य जगदीश गवळी यांनी मानले.
