धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकरी हा केंद्रबिंदू मानून उभारलेल्या रुपामाता उद्योग समूहातील रुपामाता नॅचरल शुगर प्रा. लि., युनिट क्रमांक पाडोळी (आ.) येथे गाळप क्षमता विस्तारीकरण फेज 2 हा एक ऐतिहासिक, दूरदृष्टीपूर्ण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा औद्योगिक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प केवळ कारखान्याची क्षमता वाढवणारा नसून, शेतकरीहित, रोजगारनिर्मिती व स्थानिक विकासाचा ठोस आराखडा ठरला आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे मोळीपूजन व उद्घाटन महंत योगी मावजीनाथजी महाराज (श्री तुळजाभवानी मंदिर, सिद्धगरीबनाथ मठ, तुळजापूर), हभप. ॲड. पांडुरंग लोमटे महाराज, जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, तसेच रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव विश्वनाथ गुंड-पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या विस्तारीकरणामुळे कारखान्याची प्रतिदिन 800 टन असलेली गाळप क्षमता थेट 2000 टनांनी वाढून एकूण 2800 टन प्रतिदिन इतकी झाली आहे. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत, पूर्ण क्षमतेने व जलद गतीने गाळप होणार असून, आजवर गाळपाविना राहणाऱ्या उसाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, हा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना ॲड. व्यंकटराव गुंड-पाटील यांनी सांगितले की, “ग्रामीण भागात उद्योग उभारताना नफा नव्हे, तर शेतकरी, कामगार आणि स्थानिक युवक यांचे भविष्य केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. रुपामाता उद्योग समूहाचा प्रत्येक प्रकल्प हा सामाजिक बांधिलकीतून उभा राहिलेला आहे. या विस्तारीकरणामुळे थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात तिपटीने रोजगारनिर्मिती झाली असून, परिसरातील युवक-युवतींना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे स्थलांतराला आळा बसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. याच कार्यक्रमात फेज 2 विस्तारीकरणासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पाडोळी, मेंढा, घुगी, लासोना, समुद्रवाणी, सांगवी, कामेगाव, नितळी, टाकळी, कनगरा, धुता, येवती, एकंबीवाडी आदी गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड-पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली झाली. खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या संघभावना, शिस्तबद्ध नियोजन व अथक परिश्रमामुळे शेतकरीहिताचा हा महत्त्वपूर्ण औद्योगिक विस्तार प्रत्यक्षात साकार झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू शेख यांनी केले. तर प्रास्ताविक अमोल गुंड यांनी तर सुरेश मनसुळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपामाता उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. रुपामाता नॅचरल शुगरचा हा विस्तारीकरण प्रकल्प म्हणजे केवळ एक औद्योगिक वाढ नसून, शेतकरी सशक्तीकरण, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासाचा राजकीय-सामाजिक जाहीरनामा आहे, असे मत यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
