भूम (प्रतिनिधी)- येथील प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित फनफेअर कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी घेण्यात आलेल्या या फनफेअरला पालक, नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
फनफेअरमध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, व मनोरंजनाचे खेळ याची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. पालकांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपादार्थाची विक्री करत व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. भारतीय खवय्येगिरीचा अनुभव घेताना उत्तर भारतीय पाणीपुरी, रगडा, पॅटिस, बिर्याणी तर दक्षिण भारतीय वडा सांबर, इडली, व केक पासून इतर सर्व पदार्थ बनवले होते. या संपूर्ण उपक्रमातून सुमारे अर्ध्या लाखांची उलाढाल झाली. तत्पूर्वी विद्या विकास मंडळ पाथरूड चे कोषाध्यक्ष तथा एसपी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रचार्य संतोष शिंदे यांच्या हस्ते व शाळेचे संचालक ॲड. सिराज मोगल, प्रगतशील शेतकरी रणजित मस्कर यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मेघा सुपेकर, दिपीका टकले व मोनिका बोराडे यांच्या सह आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे व अमित सुपेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. फनफेअरमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना व उद्योजकतेची भावना वृद्धिंगत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
