धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव बदलत आहे. सरलेले 2025 हे वर्ष धाराशिवसाठी विकासाच्या अनेक योजना घेऊन आले. त्यामुळे लोकांच्या विकासाच्या आशा-अपेक्षांना पालवी फुटली. नवीन वर्षात हा वृक्ष बहरत असल्याचे पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्स्फॉर्मेशनचे अर्थात मित्रचे उपाध्यक्ष. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाची पावले झपाझप पडत आहेत. सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वेमार्गाचे काम वेगात सुरू आहे. श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे तुळजापूरसह जिल्ह्याचे रूप पालटणार आहे. ही महत्त्वाची दोन्ही कामे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीतून सुरू आहेत.
गवगवा नाही, की स्टंटबाजी नाही... शांतपणे विकासाचा अजेंडा राबवणे, विरोधकांच्या बिनबुडाच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे, ही आमदार पाटील यांच्या कामाची पद्धत. त्यामुळेच विकासाच्या विविध योजना महायुती सरकारकडून मंजूर करवून घेणे त्यांना शक्य झाले. रेल्वे, तुळजापूर तीर्थक्षेत्र आराखडा, शेतकऱ्यांचे उत्पन्न 40 टक्क्यांनी वाढवणारा तारा प्रकल्प, नळदुर्ग, वाशी, भूम, परंडा, तामलवाडी, कौडगाव (टप्पा 3) वडगाव सिद्धेश्वर येथे एमआयडीसी प्रस्तावित आहेत. येडशी येथील रामलिंग अभयारण्य विकसित करणे, तुळजापूर येथे प्राणिसंग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. तेरला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहे. तेर येथील राज्यातील सर्वाच जुन्या त्रिविक्रम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या मंदिरातही विविध विकासकामे सुरू आहेत. तारा प्रकल्पाअंतर्गत तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे एक हजार एकरांवर शेतीवर आधारित विविध प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला जिल्ह्यातच अधिक दर मिळणार आहे.
धाराशिव जिल्ह्याचा विकास झाला नाही, अशी चर्चा नेहमी केली जाते. अशा चर्चा करताना जिल्ह्यात पाण्याचा शाश्वत स्त्रोत नाही, हे बहुतांश वेळा लक्षात घेतले जात नाही. पाण्याचा शाश्वत स्त्रोत नाही म्हणून विकास थांबला का?, तर अजिबात नाही. जिल्ह्यात कोणत्या क्षेत्रात काम करण्यासाठी वाव आहे, याची जाणीव माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना होती. त्यातूनच त्यांनी सिंचनाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. सिंचनाखाली आलेल्या क्षेत्राची टक्केवारी 4 वरून 21 इतकी झाली.
यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल झाला. त्यांच्या हातात पैसे खेळू लागले ते उसासारख्या नगदी पिकामुळे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या वाढली. वर्षाकाठी उसापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजारपेक्षा अधिक कोटींचे उत्पन्न मिळू लागले. हा बदल लोकांना जाणवला नसेल का? याचे उत्तर होय असे आहे, पण राजकारणासाठी या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक पद्धतीने दिले जाऊ लागले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या चर्चेला आता जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. धाराशिवसाठी उजनी धरणातून पाणी आणण्यात आले आहे. कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी साठवण्यासाठी तुळजापूर येथील रामदरा तलाव सज्ज झाले आहे. सांगली-कोल्हापुरातील वाहून जाणारे पुराचे पाणी मराठव़ाड्याकडे वळवून दुष्काळ दूर करण्याची योजना आमदार पाटील यांनी सादर केली असून, त्याला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आमदार पाटील हे उपाध्यक्ष असलेल्या मित्रच्या माध्यमातून ही क्रांतिकारी योजना राबवण्यात येणार आहे. रेल्वेचे काम ठळकपणे दिसू लागले आहे, मराठवाड्याच्या हक्काचे पाणीही लवकरच मिळणार आहे, तुळजापूर विकास आराखड्याची कामेही लवकरच सुरू होणार आहेत. तेरमधील कामांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. धाराशिवच्या विकासाबाबत जाणूनबुजून केल्या जाणाऱ्या नकारात्मक चर्चेला यामुळे ब्रेक लागला आहे. सरत्या वर्षात फुटलेली विकासाची पालवी नवीन वर्षात बहरणार आहे.
