भूम (प्रतिनिधी)- दिव्यांगत्वाच्या आधारे राज्य परिवहन महामंडळाच्या मार्फत प्रवास सवलतीलचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांची पडताळणी चालू झाल्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वापरणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणानले आणले आहेत. बोगस प्रमाणपत्र आढळल्यास स्थानिक आगार प्रमुखांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची दिव्यांग कल्याण विभागाकडून पत्राद्वारे आदेश दिले आहेत. दिव्यांग बोगस प्रमाणपत्राची भूम आगाराच्यावतीने अंमलबजावणी करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्याचे दिवांग आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पत्रामुळे भूम तालुक्यामधील बोगस दिव्यांगत खळबळ उडाली आहे.
राज्य परिवहन महामंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांगत्व ओळखपत्राची तपासणी करण्यासाठी वाहक / तिकीट तपासणीस यांनी हे मोबाईल ॲप्लीकेशन मध्ये बोगस किंवा खरा लाभार्थी ओळखता येणार आहे. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्राचा क्रमांक व जन्म दिनांक नमूद करुन सदर वैश्विक दिव्यांग ओळखपत्राच्या वैधतेची पडताळणी होणार आहे. पडताळणीअंती ओळखपत्र वैध असल्यास संबंधितास लाभ देण्यात यावा. तथापि, ओळखपत्र बनावट, अवैध अथवा चुकीचे आढळून आल्यास, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम-91 नुसार गुन्हा दाखल करावा. तसेच, सदर ओळखपत्र जप्त करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले आहे.
रा.प. आगार व विभागीय स्तरावर ओळखपत्र जप्त केल्याच्या नोंदी दप्तरी ठेवण्यात याव्यात. तसेच त्याबाबतचा अहवाल दरमहा या कार्यालयास सादर करण्यात यावा. त्याप्रमाणे भूम येथील आगाराने बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम जोरदार पद्धतीने राबविण्यात येत असून त्यामुळे बोगस लाभ घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाणपत्र पडताळणी नंतर पितळ उघडे पडू लागले आहे.