धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मित्राच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या या प्रकल्पांना राज्य सरकार आणि जागतिक बँकेकडूनही सहकार्य केले जात आहे. या सर्व महत्वकांक्षी प्रकल्पांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांना अधिक चालना मिळावी याकरिता सर्व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीस टक्के निधीची तरतूद करण्यात येत आहे आणि आपल्या जिल्ह्यात देखील प्राधान्याने त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली. त्याला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीही मान्यता दिली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीची शनिवारी ऑनलाइन पद्धतीने बैठक पार पडली. या बैठकीत मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी निगडित विविध महत्त्वाच्या विषयांवर ठाम, स्पष्ट आणि सकारात्मक भूमिका मांडत आपली विकासाभिमुख नेतृत्वशैली अधोरेखित केली. महास्ट्राईड या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या समग्र आर्थिक विकासाचा महत्त्वाकांक्षी आराखडा राज्य सरकार आणि जागतिक बँकेच्या सहाय्याने ‘मित्र’च्या माध्यमातून जिल्ह्यात राबवला जात आहे. जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनासाठी आखलेला हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक, मानवी व भौगोलिक संसाधनांचा प्रभावी वापर करून जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि शाश्वत विकास साधणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. महास्ट्राईडमुळे जिल्ह्यात खरेदी क्षमता वाढेल, आर्थिक स्थैर्य निर्माण होईल आणि विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल. ‘मित्र’ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यांना स्वयंपूर्ण, सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीस टक्के निधीची तरतूद करण्यात यावी असा शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि प्राधान्याने त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केली. त्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत अनुकूलता दर्शविली आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत ज्यांची जनावरे वाहून गेली, अशा बाधित कुटुंबांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः १०१ गोमाता भेट देऊन मोठा दिलासा दिला. या संवेदनशील व मानवतावादी निर्णयाबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव मांडत पालकमंत्र्यांचे कौतुक केले.
तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर नुकसानभरपाई दिल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करत अभिनंदनचा ठरावही सादर करण्यात आला. जिल्ह्यातील महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तुळजापूर येथे ‘उमेद मॉल’ मंजूर केल्याबद्दलही त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.
धाराशिव विमानतळाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे प्रस्तावित MRO (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल) सुविधांद्वारे विमान दुरुस्ती क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होणार असून, तांत्रिक व कुशल युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, यासाठीही आमदार पाटील यांनी अभिनंदन ठराव मांडला.
'महास्ट्राईड' प्रकल्पांतर्गत कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करताना सिंचन सुविधा बळकट करणे, आधुनिक शेती पद्धती, मूल्यवर्धन व कृषीपूरक उद्योगांना चालना दिली जात आहे. त्याचबरोबर महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना उत्पादन, प्रक्रिया व विपणनाशी जोडले जात आहे. पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटन स्थळांचा विकास करून स्थानिकांना रोजगार व उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत. महास्ट्राईडची खास ओळख म्हणजे सूक्ष्म नियोजन प्रत्येक तालुका व क्षेत्राच्या गरजेनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी. यासोबतच औद्योगिक व गुंतवणूक अनुकूल वातावरण निर्माण करून स्थानिक तरुणांसाठी रोजगारनिर्मितीला प्राधान्य ही महास्ट्राईडची वैशिष्ट्ये असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
