धाराशिव (प्रतिनिधी)- दुसरे लग्न केल्याचा राग तसेच पत्नीचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन न केल्याच्या कारणावरून मुलानेच बापाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथे घडली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयताचे नाव महिपती आंबाजी सुरवसे (वय 45, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे असून, आरोपीचे नाव धुळप्पा महिपती सुरवसे (रा. मानेवाडी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथे शेतात ही घटना घडली. आरोपी धुळप्पा सुरवसे याने मयत महिपती सुरवसे यांनी दुसरे लग्न केले. तसेच पत्नी इराप्पा हिचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केले नाही, या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला.
वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले असून, आरोपीने दगडाने मयताच्या डोक्यात जबर मारहाण केली. या मारहाणीत महिपती सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मयताची आई लक्ष्मीबाई आंबाजी सुरवसे (वय 70, रा. मानेवाडी) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मानेवाडी परिसरात खळबळ उडाली असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.