भूम (प्रतिनिधी)- विद्या विकास मंडळ, पाथरूड संचलित शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, भूम येथे दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी ‌‘युवा स्पंदन‌’ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.30 वाजता झाली.

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अनिल चोरमले, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश कानगुडे, पोलिस निरीक्षक, भूम हे उपस्थित होते. तसेच शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे सर, विद्या विकास मंडळ, पाथरूडचे कोषाध्यक्ष श्री. अतुल सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव प्रा. डॉ. संतोष शिंदे विराजमान होते. तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांची विशेष उपस्थिती होती.

स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने “शेला-पागोटे आनंदनगरी” व सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लावणी, गवळण, पोतराज गीत, रिमिक्स भारुडे, एकांकिका तसेच एकांकी नाटक आदी कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक लोककलेसोबत आधुनिक सादरीकरणाचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बक्षीस वितरण समारंभ पार पडला. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व सांस्कृतिक जाणीव विकसित होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजश्री तावरे, प्रा. जयेश मसराम, प्रा रुपाली मोरे, ग्रंथपाल प्रा. हारी महामुनी, कनिष्ठ महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मोहन राठोड तसेच प्रा. धनश्री पिंपळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

 
Top