धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा अग्रणी बँक,धाराशिव यांनी विविध बँकांच्या माध्यमातून बँकांमध्ये दावा न केलेल्या तब्बल ३१ कोटी रुपयांच्या ठेवी एक लाख एकतीस हजार खातेदारांना परत मिळवून देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सभागृह,धाराशिव येथे सोमवार, दि.२९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता एक विशेष शिबिर आयोजित केले होते.हे शिबिर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या देशव्यापी “आपली पूँजी,आपला अधिकार — Your Money, Your Right” या उपक्रमाचा एक भाग होते.

या शिबिरास श्री.विद्याचरण कडवकर,निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी अमितकुमार मिश्रा यांनी मार्गदर्शन केले.या शिबिरास जिल्ह्यातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कुमुद पंडा यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना भारत सरकारच्या या मोहिमेबाबत माहिती दिली.या मोहिमेचा उद्देश दहा वर्षांहून अधिक काळ व्यवहार न झालेली बँक खाती,मुदत ठेवी व इतर आर्थिक मालमत्ता (उदा.शेअर्स,विमा) याबाबत नागरिकांना माहिती देणे तसेच कायदेशीर वारसांना व दावेदारांना ही रक्कम परत मिळवण्यासाठी सहाय्य करणे हा आहे.त्यांनी नमूद केले की या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ३४२ खात्यांतील १.७३ कोटी रुपये खातेदारांना परत मिळवून देण्यात बँकांना यश आले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी श्री. अमितकुमार मिश्रा यांनी सांगितले की,दहा वर्षांहून अधिक काळ ज्या खात्यांमध्ये व्यवहार झालेले नाहीत,अशा खात्यांतील ठेवी रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी (DEAF) मध्ये हस्तांतरित केल्या जातात.  माहितीच्या अभावी किंवा खातेदारांचे निधन झाल्याने अनेक वेळा या ठेवींवर दावा केला जात नाही.मात्र योग्य कागदपत्रे बँकेत सादर केल्यास ही रक्कम खातेदार किंवा त्यांच्या वारसांना मिळू शकते.

भारत सरकार व भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या माध्यमातून देशभरात १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत अशी रक्कम परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.ही प्रक्रिया बँक शाखांमध्ये नियमितपणे सुरू आहे. नागरिकांनी आधार/पॅन कार्ड,बँक खात्याचे तपशील,मुदत ठेव प्रमाणपत्र (असल्यास), तसेच वारस असल्यास मृत्यू प्रमाणपत्र व वारस प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा आणि या मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कुमुद पंडा यांनी केले आहे.

 
Top