धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील उपळे (मा.) येथील हरिभाऊ घोगरे हायस्कूलमध्ये 17 जानेवारी रोजी ‌‘हिंद की चादर‌’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात प्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून केले.यावेळी व्यासपीठावर प्रशाळेचे मुख्याध्यापक .टी.डी.कांबळे,शिक्षक ए.बी. क्षीरसागर,श्रीमती घोगरे व श्रीमती वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक सचिन कांबळे यांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. वैराग्य, धैर्य, धर्मसंरक्षण तसेच धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले महान बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अतुलनीय त्यागामुळेच भारतीय समाजात मानवतावादी मूल्ये,सहिष्णुता व राष्ट्रनिष्ठेचा संदेश दृढ झाला, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक सलोखा आणि मानवतेची जाणीव निर्माण झाली.उपस्थित सर्वांनी श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार ए.बी.क्षीरसागर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम श्रद्धा, शिस्तबद्धता व प्रेरणादायी वातावरणात उत्साहपूर्वक पार पडला.

 
Top