धाराशिव (प्रतिनिधी)- आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या आयुष्मान कार्डसाठी ई-केवायसी मोहिम राबविण्यात येणार आहे.या योजनेचा सर्वकष आढावा घेण्यासाठी 1 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

सध्या जिल्ह्यात 15.23 लाख लाभार्थी असून त्यापैकी 7.31 लाख लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी केले आहे.लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी आशा कर्मचारी,स्वस्त धान्य दुकान चालक व “आपले सरकार सेवा केंद्र” कर्मचारी यांना यशस्वी ई-केवायसी साठी 20 रुपये आणि आयुष्मान कार्ड वितरणासाठी 10 रुपये मानधन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति कुटुंब वर्षाला 5 लाख रुपये मोफत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ मिळणार असून,जिल्ह्यातील 27 खाजगी आणि 13 शासकीय,एकूण 40 रुग्णालयांमध्ये तसेच महाराष्ट्रातील सुमारे 2300 रुग्णालयांमध्ये हा लाभ उपलब्ध आहे. मोफत आयुष्मान कार्ड ग्रामपंचायत स्तरावर, केंद्रे,आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातील.तसेच 70 वर्षांवरील नागरिकांनी “वय वंदना कार्ड” काढून वैयक्तिक व कौटुंबिक विमा 5 लाख रुपयांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ही विशेष मोहिम 09 जानेवारीपासून ते 31 जानेवारी 2026 पर्यंत राबविण्यात येणार असून,लाभार्थी गाव,वार्ड,वस्ती,शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण करू शकतात.तसेच आयुष्मान ॲप वापरून लाभार्थी स्वतः देखील ई-केवायसी पूर्ण करू शकतात. जिल्ह्यात आयुष्मान कार्डचे ई-केवायसी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय नियोजन करून 31 जानेवारी 2026 अखेर सर्व लाभार्थ्यांचे 100 टक्के ई-केवायसी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी दिली.


 
Top