धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव आणि भारतीय युवा शक्ती ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय मार्गदर्शक विकास कार्यक्रम तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे नुकताच आयोजित केला होता.
या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू जिल्ह्यातील युवकांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक (मेंटॉर) तयार करून प्रोत्साहन देणे हा होता. या कार्यक्रम अंतर्गत भारतीय युवा ट्रस्टचे प्रशिक्षक राम बेंडे यांनी महाविद्यालयाच्या 50 शिक्षकांना प्रशिक्षण दिले. उद्योग चालू करून तो स्थिर होण्यापर्यंत ज्या काही अडचणी येतात त्या सोडविण्यासाठीचे मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी भारतीय युवा ट्रस्टचे प्रशिक्षक राम बेंडे यांनी उद्योग मार्गदर्शक होण्यासाठी लागणारे कौशल्य, गुणवत्ता, व्यक्तिमत्व या बाबत सखोल ज्ञान प्रात्यक्षिक घेऊन समजावून सांगितले. उद्योगासाठी मार्गदर्शक बनायचे असेल तर त्या साठी लागणारी कौशल्य काय असावेत आणि ते कसे विकसित करावेत या विषयांचे सखोल ज्ञान प्रशिक्षक राम बेंडे यांनी दिली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांनी राम बेंडे आणि त्यांचे सहकारी अनिल साळवी यांचे आभार मानून, जिल्ह्यातील जे युवक उद्योग चालू करू इच्छितात त्यांना हे मार्गदर्शक नक्कीच मार्गदर्शन करतील असा विश्वास वेक्त केला. अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे स्टार्ट-अप इंडिया या भारत सरकारचा प्रमुख उपक्रमास चालना मिळेल. ज्याचा हेतू स्टार्ट-अप संस्कृतीचा उत्प्रेरक बनणे आणि भारतामधील नावीन्य व उद्योजकता यांसाठी एक कणखर आणि समावेशक इकोसिस्टीम बनविणे आहे.
