धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र विभागाअंतर्गत इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आयोजित “ब्रह्मांड की उत्पत्ति और सौरमंडल की खोज“ ही राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळा राबवण्यात आली. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राबाबत जागरूकता निर्माण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा होता.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे आऊटरिच नोडल सेंटर म्हणून कार्य करते. या अंतर्गत इस्रो आयोजित विविध कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित केले जातात. याच अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील कार्यशाळेत बिग बँग सिद्धांत, आकाशगंगा, तारे आणि ग्रहांची निर्मिती याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सूर्याची रचना, त्यातील अणुसंलयन प्रक्रिया, सूर्यकिरणांचे पृथ्वीवरील परिणाम तसेच सौरऊर्जा यांचे महत्त्व सोप्या भाषेत स्पष्ट केले. सौरमंडळातील ग्रह, उपग्रह, लघुग्रह तसेच अलीकडील अंतराळ मोहिमांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सदर कार्यशाळेसाठी इस्रो देहरादून येथील डॉ. दिपांकर बॅनर्जी व डॉ. राघवेंद्र प्रताप सिंग हे शास्त्रज्ञ व अभ्यासक साधन व्यक्ती म्हणून लाभले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व इसरो नोडल सेंटर समन्वयक डॉ. कुणाल वनंजे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अभयसिंह खुणे यांनी केले तर आभार प्रा. संजय घोडके यांनी मानले. या कार्यशाळेसाठी डॉ. मंगेश भोसले, प्रा. अक्षय स्वामी, डॉ. अंकुश भोसले व प्रा. अविनाश कोकरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top