कळंब (प्रतिनिधी)- नगर परिषद कळंबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. सुनंदाताई शिवाजी कापसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आढावा बैठकीत नगर परिषद प्रशासनाला स्पष्ट आणि ठोस दिशा दिली आहे. नागरिक सेवा, शहर स्वच्छता आणि वेळेत कामे या बाबींमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी श्रीमती मंजुषा गुरमे यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक पार पडली. बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्या तातडीने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले.

शहराच्या स्वच्छतेमध्ये आरोग्य विभाग व सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत, सर्व प्रभागांमध्ये नियमित स्वच्छता, नाल्यांची वेळेवर साफसफाई आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे स्पष्ट आदेश अध्यक्षा कापसे यांनी दिले. घंटागाडी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक प्रभागातून वेळेत कचरा संकलन करावे, नागरिकांना स्वच्छतेबाबत कोणतीही अडचण येऊ देऊ नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

“नगर परिषद म्हणजे नागरिकांसाठी सेवा केंद्र आहे. नागरिकांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे. हलगर्जीपणा, दिरंगाई किंवा दुर्लक्ष याला यापुढे थारा दिला जाणार नाही,” असा ठाम सूर अध्यक्षा कापसे यांनी व्यक्त केला.

मुख्याधिकारी श्रीमती मंजुषा गुरमे यांनीही सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांना नागरिकांना वेळेत, पारदर्शक व दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना आवाहन करण्यात आले की, घरगुती व व्यावसायिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या ओल्या व सुका कचऱ्याचे विलगीकरण करून दारात येणाऱ्या घंटागाडीतच कचरा टाकावा, जेणेकरून शहर स्वच्छ व सुंदर राहील.

या बैठकीस कार्यालयीन अधीक्षक श्री. एल. एस. वाघमारे, आरोग्य विभाग प्रमुख श्री. संजय हजगुडे, आस्थापना, बांधकाम, पाणीपुरवठा, भांडार, वसुली, नगर रचना, विद्युत तसेच सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 
Top