धाराशिव (प्रतिनिधी)- भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव येथील कोपा व्यवसायातील प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या इलेक्ट्रॉनिक अल्बम ई-फंक्शन मॅनेजमेंट सिस्टीम या नाविन्यपूर्ण प्रकल्पास तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनामध्ये बिगर अभियांत्रिकी व्यवसाय प्रवर्गात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. यावेळी टाटा स्ट्राईव्ह प्रकल्पांतर्गत टाटा या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून या प्रकल्पास विशेष प्राविण्यता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
हा नाविन्यपूर्ण प्रकल्प रुपामाता परिवार यांच्या सौजन्याने प्रायोजित करण्यात आला असून आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून समाजोपयोगी गरजांची पूर्तता करणारा असल्याने सदर प्रकल्पास मान्यवरांकडून विशेष प्रशंसा प्राप्त झाली. या प्रकल्पामध्ये प्रशिक्षणार्थी आयान शेख, गणेश रोटे, सुरज सोनटक्के व रितेश ढगे यांनी सहभाग नोंदविला. या प्रकल्पासाठी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव येथील शिल्प निदेशक (कोपा) डॉ. किरण प्रकाश झरकर यांनी मार्गदर्शन केले.
या प्रकल्पास प्राप्त झालेल्या यशाबद्दल कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे, आयएमसी सदस्य सचिन केंगार, चंदन भडंगे, निशांत होनमोटे, प्राचार्य व्ही. व्ही. माने, टाटा कंपनीचे अधिकारी सुदर्शन धारूरकर, श्रीपाद कुलकर्णी, मॅजिक कंपनीचे संचालक देविदास राठोड, प्रा. डॉ. सुशील होळंबे, एल. एम. माने, प्राचार्य मारुती बिराजदार, केशव पवार, हर्षद राजुरकर, संजय माळकुंजे यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी प्रकल्पाची विभागस्तरीय तंत्र प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली असून, भविष्यात हा प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
