धाराशिव (प्रतिनिधी)-  लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील राका गाव येथील व नवोदय जवाहर विद्यालय, लातूर येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेल्या दलित समाजातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानवी हक्क अभियानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत सविस्तर निवेदन सादर करून उच्चस्तरीय चौकशीची व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर विद्यार्थिनीचा मृत्यू दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी झाल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थिनीचे पालक व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहावर ठिकठिकाणी जखमा आढळून आल्या असून सदर मृत्यू आत्महत्येचा नसून संशयास्पद असल्याचा ठाम दावा करण्यात आला आहे. गळफास घेतल्याचे कारण पुढे करण्यात आले असले, तरी संबंधित कपड्याची लांबी व परिस्थिती पाहता या घटनेत अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत. जर या प्रकरणात शासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही, तर मानवी हक्क अभियानच्या वतीने पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यातील निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा सल्लागार अरुण कुमार माने, जिल्हा सचिव मोहन ताटे, रज्जाक सय्यद, सुग्रीव कांबळे, यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

 
Top