वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, गायरानधारक तसेच निराधार घटकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जाणीव संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि. 19 जानेवारी रोजी वाशी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.

या मोर्चामध्ये दिव्यांगांप्रमाणे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना, एकल महिला व निराधार लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये मानधन देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. वाशी तालुक्यात सन 1985 पासून दलित, भूमिहीन व आदिवासी समाजातील कुटुंबे पडीत गायरान जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे या कुटुंबांच्या नावे सातबारा नोंद करून पिकांचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणीही मोर्चामार्फत करण्यात येणार आहे.

तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजनांसाठी लागू असलेली 21 हजार रुपयांची वार्षिक उत्पन्न अट रद्द करून ती 60 हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे कर्ज, वीज बिल व शैक्षणिक फी माफ करावी, मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार प्रलंबित अनुदान वितरित करावे, घरकुल व घरपरजरीचे अनुदान तातडीने देण्यात यावे, तसेच मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू करून मजुरांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले असून, या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ नागडे यांनी केले आहे.

 
Top