धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील मौ. डोंगरवाडी येथील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांच्या अपघाती मृत्यूनंतर प्रशासन आणि साखर कारखान्यांकडून सुरुवातीला दुर्लक्ष होत असताना, मानवी हक्क अभियानाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिलेल्या निवेदनामुळेच अखेर या प्रकरणाला गती मिळाली. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित यश साखर कारखान्याकडून मृत कामगाराच्या कुटुंबाला 23 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली असून हा संपूर्ण न्यायसंघर्षाचा विजय मानवी हक्क अभियानालाच श्रेयस्कर असल्याचे बोलले जात आहे.
कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात गणेश डोंगरे यांचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी व तीन लहान मुलांचे भवितव्य अंधारात गेले होते. शासन, प्रशासन आणि साखर कारखाने गप्प असताना मानवी हक्क अभियानाने पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. मृत कामगाराच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शासन व कारखान्यांनी घ्यावी, तसेच किमान 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली होती. या निवेदनानंतरच संबंधित यश साखर कारखान्याला हालचाल करावी लागली. संघटनेच्या दबावामुळे 19 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला, तसेच ऊसतोड कामगार महेश याने घेतलेली 4 लाख रुपयांची उचल पूर्णतः माफ करण्यात आली. त्यामुळे एकूण 23 लाख रुपयांची मदत कुटुंबाला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मानवी हक्क अभियानाने ही मदत प्राथमिक असल्याचे सांगत मृत कामगाराच्या कुटुंबाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका घेतली आहे. संघटना नसती तर हे प्रकरण दडपले गेले असते, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या यशाचे सर्व श्रेय मानवी हक्क अभियानाच्या लढाऊ भूमिकेला व प्रशासनावर टाकलेल्या दबावालाच जाते, असे स्पष्ट मत व्यक्त होत आहे. या निवेदनावर मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा सचिव माहन ताटे, समन्वयक अरुणकुमार माने, सय्यद रझाक, सुग्रीव कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.