धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारीवरून शिवसैनिकांनी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राजन साळवी यांना घेराव घालून, चर्चा केली असता शिवसैनिक व साळवी यांच्यात खंडाजंगी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे शिवसेनेचे युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अविनाश खापे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क प्रमुख राजन साळवी यांना शिवसैनिकांचे मत मांडताना आपणास शिवसैनिक म्हणून घेण्यास लाज वाटते. तुम्ही दिवसभर आमच्या सोबत असता आणि रात्री युतीतील भाजप नेत्यांसोबत बैठक घेता. आमदार राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म आणून देतात हे योग्य नसल्याचे भ्रमणध्वनीवर बोलले. कळंब-धाराशिव मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेतला होता. परंतु आता पुर्णपणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एबी फॉर्म वाटण्याचे भाजपच्या हातात गेले आहे. असे सांगून अविनाश खापे यांनी शिवसेनेचे जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवार शिंदे यांना मल्हार पाटील यांनी एबी फॉर्म आणून दिला हे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर साळवी यांनी विधानसभेचे शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार अजित पिंगळे यांनी या मतदारसंघातील उमेदवारीबाबत निर्णय घेतल्याचे साळवी यांनी या भ्रमणध्वनीवर सांगितले. यावर खापे यांनी पिंगळे हे आमदार पाटील यांचे समर्थक आहेत. त्यामुळे या निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्याकडे द्या अशी आमची मागणी होती. असे सांगून खापे यांनी मी सावंत यांचा समर्थक किंवा आर्थिक लाभधारक नाही, असे सांगून शिवसेना वाचविण्यासाठी आमदार सावंत योग्य असल्याचे सांगितले. त्यानंतरही अविनाश खापे व संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यात बरीच चर्चा झाली. यावेळी साळवी यांनी बरेच मुद्दे खोडून असे काही झाले नसून, पालकमंत्री प्रताप सरनाईक 26 जानेवारीला येत आहेत. आपण सर्वजण बसून फायनल निर्णय घेवू असे सांगितले.
धाराशिव जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीपासून शिंदे यांच्या शिवसैनिकात गोंधळाची परिस्थिती असून, तीच परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कायम राहिल्यामुळे शिवसैनिका संताप व्यक्त केला जात आहे.

