तुळजापूर (प्रतिनिधी)-  रथसप्तमीचा पवित्र योग आणि शनिवार-रविवार-सोमवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा लाभ मिळाल्याने रविवारी (दि. 25) तीर्थक्षेत्र तुळजापुरात भाविकांचा अक्षरशः महापूर उसळला. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या असून रथसप्तमी निमित्त देवीच्या सिंहासनावर भव्य रथालंकार महापूजा मांडण्यात आली होती.

रविवारी पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन धर्मदर्शनास प्रारंभ झाला. सकाळी सहा वाजता देवीजींचे अभिषेक व भाविकांचे अभिषेक  सुरू झाले ते सकाळी दहा वाजेपर्यंत चालले. त्यानंतर देवीजींना वस्त्रालंकार परिधान करून नित्योपचार पूजा संपन्न झाली. या विशेष पूजाविधींच्या पार्श्वभूमीवर देवीदर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. धर्मदर्शन, मुखदर्शन, अभिषेक दर्शन आणि सशुल्क दर्शनाच्या सर्व रांगा भाविकांनी तुडुंब भरून वाहत होत्या. रथालंकार पूजेच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. .

देवीदर्शनानंतर भाविकांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी करत पूजेचे साहित्य, प्रसाद, देवीचे फोटो व मूर्तींची खरेदी केली. मात्र मोठ्या संख्येने भाविक खाजगी वाहनांनी आल्याने संपूर्ण तुळजापूर शहराला जणू वाहनतळाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहतूक नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत होता. मंदिराच्या महाद्वारासमोर किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने भाविकांना दर्शन रांगेत जाण्यास मोठी कसरत करावी लागत होती. अरुंद रस्ते, अतिक्रमणे आणि वाढती गर्दी यामुळे भाविकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याने या संपूर्ण प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

 
Top