धाराशिव (प्रतिनिधी)- जलसंधारण आणि पडीक जमीनीच्या शाश्वत विकासासाठी युवकांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन जल व मृदा व्यवस्थापन विभाग प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव डॉ. नितीन पाटील यांनी केले. काजळा येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, जलसंधारण म्हणजे पावसाचे पाणी अडवणे, साठवणे, जमिनीत मुरवणे आणि त्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करणे. आज अनेक भागांत भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घटली असून विहिरी, बोअरवेल कोरड्या पडत आहेत. यावर जलसंधारण हाच प्रभावी उपाय मानला जातो. पावसाचे पाणी साठवण, नाला बंडिंग, चेकडॅम, शेततळे, समतल चर, परकोलेशन टँक, तसेच ठिबक व तुषार सिंचन यांसारख्या उपायांमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर शक्य होतो. या उपायांमुळे शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेले स्रोत टिकवून ठेवता येतात. पाण्याच्या अभावामुळे, मृदा धूप, क्षारयुक्त जमीन, अति चराई, जंगलतोड आणि चुकीच्या शेती पद्धतींमुळे मोठ्या प्रमाणावर जमीन पडीक होत आहे. पडीक जमीन म्हणजे जिथे शेती होत नाही किंवा उत्पादन क्षमता अत्यल्प आहे अशी जमीन. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते, बेरोजगारी वाढते आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण होतो. पडीक जमिनीचा शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला हानी न पोहोचवता, दीर्घकाळ उपयोगी पडेल अशा पद्धतीने त्या जमिनीचा विकास करणे. यामध्ये जलसंधारण, मृदासंधारण, वृक्षारोपण, चारागाह विकास, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि बहुविध पीक पद्धती यांचा समावेश होतो.
तर अध्यक्षीय समारोप करताना प्र प्राचार्य डॉ. संदीप देशमुख म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मातिशी नाते अतूट राहीले पाहिजे. कारण माती मधुन अन्न निर्माण तर होतेच पण श्रमाचे मूल्य देखील मातीतूनच कळते. यावेळी रत्नाकर मस्के, गावचे प्रथम नागरिक प्रविण बाबुराव पाटील, किशोर लिंगे, विष्णुदास आहेर, मुख्याध्यापक शिवाजी वागतकर, कार्यक्रमाधिकारी डॉ दत्तात्रय साखरे, डॉ अवधूत नवले,प्रा मोहन राठोड, डॉ स्वाती जाधव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
