भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी नुकतीच वालवड ता. भूम येथील खवा, पेठा कारखान्यास शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना दुग्धप्रक्रिया उद्योगाची प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे हा होता.

कारखान्यात विद्यार्थ्यांना खवा निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया, दुधाची गुणवत्ता तपासणी, स्वच्छतेचे महत्त्व तसेच आधुनिक यंत्रसामग्रीची माहिती देण्यात आली. खवा कसा तयार केला जातो, त्याचे प्रकार व त्याचा मिठाई उद्योगात कसा उपयोग होतो याचे प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले. कारखान्याचे मालक श्री. लोखंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून दुग्धव्यवसायातील संधी व रोजगाराच्या शक्यतांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी या वेळी उत्सुकतेने प्रश्न विचारून आपले ज्ञान वाढवले. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या वेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. शामसुंदर आगे, डॉ. नितीन पडवळ, डॉ. राजश्री तावरे उपस्थित होते. शेवटी विभागाच्या वतीने कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले.

 
Top