भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सावरगाव (पाथरूड) येथील ग्रामीण, दुष्काळग्रस्त व वंचित पार्श्वभूमीतून आलेले बालाजी सोमनाथ शिंदे यांची इंग्लंडमधील University of Bristol (जगातील टॉप 100 विद्यापीठांपैकी एक) येथे MSc (Education) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

बालाजी शिंदे यांचे आई-वडील पूर्वी ऊसतोड कामगार व बांधकाम मजूर म्हणून अत्यंत कष्टकरी जीवन जगत होते. अशा कठीण सामाजिक व आर्थिक परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी उच्च शिक्षणाचा मार्ग अविरतपणे चालत हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या यशाला आणखी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण या अभ्यासक्रमासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून त्यांना National Overseas Scholarship (NOS)  मंजूर झाली आहे. या शिष्यवृत्तीचा निकाल 9 जानेवारी रोजी जाहीर झाला असून, देशभरातून केवळ 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून एकमेव निवड बालाजी शिंदे यांची झाली आहे.

शारीरिक दिव्यांग व्यक्ती म्हणून अनेक सामाजिक, आर्थिक व भौगोलिक अडचणींवर मात करत, शिक्षणावरील दृढ विश्वास, सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी ही कामगिरी साध्य केली आहे. हे यश केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील दिव्यांग तसेच सर्वसामान्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

बालाजी शिंदे यांनी आपले शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शासकीय आश्रमशाळेतून पूर्ण करत पुढे भारतातील नामांकित शैक्षणिक संस्था टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथून उच्च शिक्षण घेतले आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते NGO  आणि CSR क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून, याआधी ते  Rise Bionics, बेंगळुरू येथे Regional Lead  (प्रादेशिक व्यवस्थापक) म्हणून कार्यरत होते.

समविचारी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी 2020 साली ‌‘दिव्यांगहिताय माहिती व मार्गदर्शन केंद्र (DIGCP)‌’ या व्हॉट्सॲप-आधारित सामुदायिक उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना, शिक्षण, रोजगार, मार्गदर्शन तसेच स्वयंसेवी सेवांबाबत माहिती व सहाय्य दिले जाते.

त्यांना प्रेरणास्थानांविषयी विचारले असता, बालाजी शिंदे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीतील संघर्षपूर्ण भूतकाळालाच आपली खरी प्रेरणा असल्याचे सांगितले आहे. तसेच या यशामध्ये आपले कुटुंबीय, एकलव्य इंडिया फाउंडेशनचे राजू केंद्रे आणि मित्र तुकाराम गायकवाड यांच्या मोलाच्या सहकार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला आहे. बालाजी शिंदे यांच्या या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


 
Top