धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे जीवन तत्वनिष्ठ योध्दयाचे होते असे प्रतिपादन डॉ. मच्छिंद्र नागरे यांनी केले आहे. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व्याख्यानमालेच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी डॉ. मच्छिंद्र नागरे, बोलत होते.

डॉ. नागरे पुढे ते म्हणाले की,दि.9 जून 1919 ते 8 ऑगस्ट 1987 हा इतक्या वर्षाचा प्रवास थक्क करणारा होता,या 68 वर्षाच्या जीवन प्रवासात रानावनातून, दऱ्याखोऱ्यातून अनवाणी प्रवास,तो ही निःस्वार्थी,या सामाजिक भावना होत्या. बापूजींचे जीवन हे पवित्र गंगेसारखे होते. आणि त्यांनी त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन पवित्र केले. बापूजींनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा शैक्षणिक इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांचे जीवन सार्वजनिक जीवनात समरस झाले होते. चांगले कार्य करत असताना अनेकांनी अडचणी निर्माण केल्या. बापूजी 1958 मध्ये मराठवाड्यात आले. त्यावेळी बापूजींचे गुरू अप्पासाहेब पवार शिक्षण सचिव होते. मराठवाड्यात निजामशाहीचा प्रभाव संपला नव्हता. कसदार जमिनीत पिकं घेणं अवघड नाही, पण माळरानावर शेती करणारा खरा धुरंधर ठरतो. 20 जून 1959 मध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालय एका ताडपत्री खाली सुरू झाले. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कणबरकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिकुल परिस्थितीमध्ये महाविद्यालय चालवले. 

यावेळी प्रमुख पाहुणे नानासाहेब पाटील म्हणाले की, जस जसं पिढ्या बदलत चालल्या आहेत तसं तसं शिक्षणपद्धती बदलत चालली आहे. पण पध्दती कितीही बदलल्या तरी हाडा मासाचीच माणसं असतात त्यांना आयुष्यात निटनिटकेपणा हवा असतो. शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचे व्यक्तिमत्त्व हे वैश्विक आहे. कारण संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले आणि बापूजींनी देखील शैक्षणिक प्रबोधनाचे पवित्र कार्य केले.  प्राचार्य डॉ संदीप देशमुख म्हणाले की,शिक्षण घेऊन मोठी झालेली जी माणसं आहेत त्यांना आपण संस्थेत शिक्षण घेतले त्याबद्दल आदर असतोच, बापूजींच्या विचारांचा प्रपंच हा जागतिक पातळीवर होणे आज गरजेचे आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ मदनसिंह गोलवाल, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ मंगेश भोसले, प्रा विवेकानंद चव्हाण, डॉ बालाजी गुंड, डॉ केशव क्षीरसागर, डॉ अरविंद हंगरगेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. सदरप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top