वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी (राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब) आणि आखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती तथा राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख व्यक्ते प्रा.डॉ श्रीराम मुळीक (उपमुख्याध्यपक संस्कार प्रबोधिनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सरमकुंडी), कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम, ग्रामीण रुग्णालय वाशी येथील आय.सी टी.सी समुपदेशक परमेश्वर तुंदारे,अजय टोले (जिल्हा संघटक,आखिल भारतीय विद्यार्थी परिषद) व संयोजक प्रा.डॉ आनंद करडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.डॉ श्रीराम मुळीक म्हणाले की,स्वामी विवेकानंदांचा अडचणी वर मात करणे आणि आपल्यामधील प्रतिभा शोधणे तसेच ध्येय प्राप्तीसाठी अपरिमित कष्ट करणे हा संदेश अंगीकारावा. ज्ञान,व्यायाम आणि संस्कार या स्वामी विवेकानंदांच्या त्रिसूत्रीचे अनुकरण करावे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की, जिजाऊंनी दोन छत्रपती दिले व त्यांच्या आदर्श शिकवणुकीमुळे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले.
विवेकानंदांचा कर्म सिद्धांत व योग सिद्धांतावर पगडा असून त्यांनी आपणाला प्रचंड आत्मविश्वास दिला तेंव्हा आपण जिजामाता व विवेकानंद यांच्या कडून प्रेरणा घेणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. यावेळी विज्ञान प्रदर्शनामध्ये यश मिळाल्याबद्दल उदयसिंह देशमुख,वेदांत शिंदे व कु.ईश्वरी डोरले यांचा पाहुण्यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ आनंद करडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ दैवशाला रसाळ यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महादेव उंदरे यांनी केले तर प्रा.मिलिंद शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.कृष्णा थोरात,मुकुंद कोळी,दत्ता फुले व नरसिंग ढवळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.
