परंडा (प्रतिनिधी)-  श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयास नुकतेच  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाने शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (AAA ) 2025 मध्ये महाविद्यालयास  अ प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. 

या महाविद्यालयाने गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या विविध कामकाजाचे ऑडिट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाने केले होते. महाविद्यालयातील अस्तित्वात असलेल्या सर्व विभागाच्या माहितीचे अंकेक्षण करण्यात आले होते. या समितीमध्ये महाविद्यालयातील समितीचे चेअरमन म्हणून डॉ. विद्याधर नलवडे तसेच या समितीचे सदस्य म्हणून डॉ.संतोष काळे, डॉ.अरुण खर्डे आणि डॉ. अमर गोरे पाटील यांनी काम पाहिले होते. महाविद्यालयास मिळालेल्या या मानांकनसाठी महाविद्यालयात समितीचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी समितीचे चेअरमन डॉ.विद्याधर नलावडे समितीचे सदस्य डॉ.अरुण खर्डे, डॉ.संतोष काळे आणि डॉ.अमर गोरे पाटील यांचा शाल बुके देऊन  सत्कार केला. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव, उप प्राचार्य डॉ.महेशकुमार माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. यावेळी कला वाणिज्य व विज्ञान  विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

याप्रसंगी प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपले महाविद्यालय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे आपले योगदान द्यावे. महाविद्यालयाचे नाव नावलौकिक करावे महाविद्यालयाच्या विकासासाठी संस्था कोठेच कमी पडणार नाही.   तेव्हा सर्वांनीच प्रामाणिकपणे काम करून महाविद्यालयाचे नाव विद्यापीठाच्या यादीमध्ये सर्वप्रथम आणावे ही अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले. प्रास्ताविक डॉ महेशकुमार माने यांनी केले. डॉ.विद्याधर नलवडे यांनी महाविद्यालयास  AAA चा अ प्लस दर्जा कसा प्राप्त झाला त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागली या संदर्भात सविस्तर वृत्तांत सांगितला. शेवटी प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले.कार्यक्रमाचे आभार डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी मानले.

 
Top